महाराष्ट्र सांभाळण्याचा आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची दृष्टी, शक्ती ज्यांच्यामध्ये आहे असे आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि नेते जयंतराव पाटील, ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले ते संसदेतील आमचे सहकारी अमोल कोल्हे, निलेश लंके, धैर्यशील मोहिते- पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे, शिवाजीराव नाईक, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, महेबूब शेख, सुनील गव्हाणे, प्रकाश गजभिये, नागेश फाटे, पंडित कांबळे, व्ही. बी. पाटील, नितेश कराळे, अन्य सर्व व्यासपीठावरचे सहकारी आणि उपस्थित बंधू-भगिनींनो..!
आजचा हा एका दृष्टीने ऐतिहासिक सोहळा आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन राष्ट्रवादीचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे कष्ट आमच्या सहकाऱ्यांनी घेतले. ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू केली आणि त्याची सांगता आज या ठिकाणी होत आहे. ही सांगता ऐतिहासिक आहे. मला आठवतंय की, काही वर्षांपूर्वी देशाचे प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत यात्रा’ सुरू होती. ती महाराष्ट्रात आल्यानंतर तिचं स्वागत राजारामबापू पाटील यांनी केलं. महाराष्ट्राची सीमा संपेपर्यंत बापू त्या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. मला आठवतंय ते शेतकऱ्यांचे दुखणे मांडण्यासाठी जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडी काढली होती. त्या दिंडीमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत राजाराम बापू सहभागी झाले होते. हा इतिहास ज्यांचा आहे त्यांच्या सुपुत्राने शिवछत्रपती स्वराज्य यात्रा चालू केल्यानंतर ती यशस्वी करण्याच्या साठी प्रयत्नांची पराकष्टा केली त्याची नोंद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोक घेतल्याशिवाय राहणार नाही.
आज एका वेगळ्या स्थितीतून महाराष्ट्र जातोय, चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्याची किंमत दुर्दैवाने महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रातील लोकांना द्यावी लागतेय. तुमची आणि माझी भगिनी, तुमची आणि माझी कन्या तिच्या समस्येबद्दल जयंतरावांनी अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या. अलीकडच्या काळामध्ये हे सरकार त्यांच्या हातामध्ये सत्ता खऱ्या अर्थाने होती त्यावेळेला जे करायला हवं होतं ते करण्यासाठी कधी त्यांनी भूमिका घेतली नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी त्यांची जागा दाखवल्यानंतर अनेक गोष्टींच्या आठवणी त्यांना व्हायला लागल्या. बहिणीची आठवण झाली. लाडकी बहीण. ठिकठिकाणी सांगितलं जातं ही योजना आम्ही काढली, तिच्या हिताची जपणूक आम्ही करू. मी काही याबाबतीत अधिक बोलणार नाही. पण एकच आहे की, या महाराष्ट्रामध्ये बहिणींसाठी, त्यांना सन्मान देण्याच्यासाठी कोणत्या कालखंडामध्ये कोणते निर्णय घेतले होते? त्याची आठवण करण्याच्या संबंधीची वेळ आहे.
मला आठवतंय स्त्रियांना आरक्षण ९ टक्क्यांवरून सुरुवात केली, आज ५० टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे. माझी भगिनी गावची सरपंच झाली, माझी भगिनी पंचायत समितीची सभापती झाली, माझी भगिनी नगरपालिकेची अध्यक्ष झाली, माझी भगिनी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या महानगरपालिकांमध्ये महापौर झाली. त्यांना सन्मान देण्यासंबंधीचं काम कोणत्या कालखंडामध्ये झालं होतं? त्याची आठवण जर केली त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन हा काही एक दिवसाचा नव्हता. निर्णय घेतला तो निर्णय आजपर्यंत चालू राहिलेला आहे. सन्मान करायचा असेल तर तो टिकाऊ असला पाहिजे, कायमस्वरूपाचा असला पाहिजे. आज लाडकी बहीणच्या नावाने काही रक्कम तुम्ही हातामध्ये ठेवली त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण आज प्रश्न ते नाही आहेत. ज्याचा उल्लेख या ठिकाणी जयंतरावांनी केला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी रोजचे वर्तमानपत्र हे काढलं तर एक गोष्ट आपल्याला दुर्दैवाने वाचायला मिळते कुठे ना कुठे तरी स्त्रियांवर अत्याचार झाला. पुणे जिल्ह्यामध्ये सासवडच्या जवळचा एक घाट आणि त्या घाटामध्ये एका मुलीवर चार जणांनी अत्याचार केला. पुणे शहरापासून वीस किलोमीटरवर, हे पाहिजे आपल्याला? ठाणे जिल्ह्यामध्ये चार वर्षांच्या बालिकेच्या वर दोघांनी अत्याचार केले. कुठे केले? शैक्षणिक संस्थेमध्ये केले, हे महाराष्ट्रामध्ये घडतंय? कितीतरी गोष्टी आहेत. या अत्याचारासंबंधीची परिस्थिती ज्यांनी निर्माण केली त्यांच्या हातात सत्ता ठेवायची नाही हा निकाल बहिणींनी आणि त्या बहिणींच्या सगळ्या भावांनी निश्चितपणाने केला पाहिजे, आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.
हे जे काही चित्र महाराष्ट्रात आहे ते चित्र बदललं पाहिजे. आम्हाला वेगळा महाराष्ट्र पाहिजे, वेगळा महाराष्ट्र याचा अर्थ काय? महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी उद्याचा महाराष्ट्र कसा होणार? आणि कसा केला जाईल? यासंबंधीची भूमिका मांडली. ती भूमिका कृतीमध्ये आणण्यासाठी अनेकांनी कष्ट केले. वसंतदादांनी कष्ट केले, राजाराम बापूंनी कष्ट केले, अनेकांची नावे सांगता येतील. या सगळ्यांची इच्छा होती की, एक शक्तिशाली प्रगत महाराष्ट्र उभा करायचा आणि हे काम या नेतृत्वाने केले. आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता असेपर्यंत या कामावर अधिक लक्ष केंद्रित केलेलं होतं. पण हल्लीच्या काळामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या हिताची जपणूक हा विषय त्यांच्या समोर राहिलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र अनेक क्षेत्रांमध्ये कमी आहे, ज्याची आकडेवारी आपल्या भाषणामध्ये जयंतरावांनी सांगितली. एक क्षेत्र असं नाही की आज दक्षिणेच्या राज्यांशी तुलना केली, उत्तरेच्या काही राज्यांशी तुलना केली तर महाराष्ट्र त्याच्यामध्ये खालच्या पातळीवर दिसतो. एकेकाळी देशात पहिल्या क्रमांकाचे महाराष्ट्र राज्य, हा महाराष्ट्राचा लौकिक होता, तो लौकिक आज घसरलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सावरायचा, महाराष्ट्र पूर्वस्थितीवर आणायचा हे काम खऱ्या अर्थाने तुम्हाला मला सगळ्यांना करायचे आहे. त्यासाठी हा उद्यापासूनचा निवडणुकीचा कालखंड जो आहे, त्या कालखंडामध्ये एक प्रकारचे जनमत तयार करण्याची खबरदारी ती आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. मला आनंद आहे त्याची सुरुवात इथून होत आहे.
हा सगळा परिसर एक ऐतिहासिक परिसर आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशाच्या भागांमध्ये अनेक ठिकाणी अनेकांनी संघर्ष केला. पण जो संघर्ष, जो स्वातंत्र्याचा लढा या देशाच्या इतिहासाचा भाग झालेला आहे त्यामध्ये शिराळा आणि वाळवा याचा उल्लेख केल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होत नाही. मला आठवतंय बिळाशीचा सत्याग्रह. त्या बिळाशीच्या सत्याग्रहामध्ये अनेकांनी सामुदायिक शक्तीच्या जोरावर, ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य ढळत नाही असं म्हणणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा धडा शिकवण्याचे काम याच मातीमध्ये केलं. याच्यामध्ये अनेक कर्तुत्ववान, द्रष्टे स्वातंत्र्य सेनानी या मातीमध्ये जन्माला आले. त्याचे स्मरण ठेवणे ही तुमची – माझी जबाबदारी आहे. क्रांतिसिंह नाना पाटील असतील, डीडी बापू असतील, नागनाथ नाईकवाडे असतील, आनंदराव नाईक असतील, फत्तेसिंह आप्पा नाईक असतील, एस डी पाटील असतील, वसंतदादा असतील, यशवंतराव चव्हाण असतील, राजारामबापू पाटील असतील या सगळ्यांनी या देशाला मुक्त करण्यासाठी आणि योग्य रस्त्यावर नेण्यासाठी आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा कालखंड हा आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेला आहे. त्यामुळे एवढे मोठे योगदान आपल्या वरिष्ठांनी आपल्याला दिलं. आज त्या योगदानाची नोंद करून नुसतं बसून चालणार नाही. त्या योगदानाची आठवण करणे आणि ज्या प्रकारचा महाराष्ट्र हा घडवायचा स्वप्न ह्या स्वातंत्र्य सेनानींच्या अंत:करणात होता, विचारात होता तो महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, उभा करायचा आहे. ते उभं करण्याच्या संबंधीचं सूत्र नजरेसमोर ठेवा आणि त्या पद्धतीने कामाला लागा.
मला एका गोष्टीचे आनंद आहे ते सगळे काम करण्यासाठी आज जयंतराव ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतायत, काम करतायेत, कष्ट करतायेत, लोकांना विश्वास देतायत, दिलासा देत आहेत त्यांच्या या प्रयत्नांच्या पाठीशी महाराष्ट्राची तरुण पिढी सामुदायिक पणाने एका विचाराने निश्चित उभी राहील आणि जे स्वप्न आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात महाराष्ट्राबद्दलचे आहे त्याची पूर्तता या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम एक ऐतिहासिक काम आहे आणि ज्या भागातील नेतृत्वाने स्वातंत्र्याच्या साठी एक इतिहास निर्माण केला मला आनंद आहे की आजच्या पिढीच्या जयंतरावसारख्या नेतृत्वाला उद्याचा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी, सावरण्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी ही तुमची, माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असली पाहिजे. त्यांनी आत्ता सांगितलं त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं आहे, विचार सांगायचे आहेत, दृष्टिकोन सांगायचा आहे, कसा महाराष्ट्र उभा करायचा? हे सांगायचं आहे आणि एक प्रत्यक्ष घडवायचे आणि हे करण्यासाठी त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना आपले घर, आपला मतदारसंघ हे सांभाळण्याचे काम तुम्हा सर्वांना करावे लागेल. हे काम तुम्ही कराल याचा मला शंभर टक्के विश्वास आहे. या सगळ्या कामाला आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. मी एवढच सांगतो पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो, देशाच्या पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो की उद्याचा महाराष्ट्र सावरण्याच्यासाठी आणि उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण हे गाव मोठे ऐतिहासिक गाव आहे. या साखराळे गावामध्ये साखर कारखाना उभे करण्याचे काम राजाराम बापूंनी केलं होतं. याच गावामध्ये आज आपण जमतोय आणि याच भागातल्या सुपुत्राच्या हातामध्ये महाराष्ट्र उभारण्याची, महाराष्ट्र सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची ही जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकतोय. मी आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे आमचे सगळे सहकारी आणि महाराष्ट्राची तरुण पिढी शक्तीने त्यांच्या पाठीशी उभी राहील, हा दिलासा आणि हा विश्वास या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो.
जय हिंद, जय महाराष्ट्र!