कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभिकरण लोकार्पण जिल्ह्यात पर्यटनवाढीला प्राधान्य  – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

       सिंधुदुर्गनगरी, :  आपल्या जिल्ह्याला पर्यटनाची परंपरा लाभलेली आहे. जिल्ह्यात पर्यटन वाढल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थलांतर थांबेल. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनवाढीला प्राधान्य देणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.

            कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभिकरणाचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नारायण राणे, माजी खासदार निलेश राणे, कोकण रेल्वे बोर्डाचे वित्त संचालक राजेश भडंग, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री म्हणाले, मी कोकणचा भुमिपुत्र असून कोकणच्या विकासासाठी कायम झटणार आहे. मला पालकमंत्री पदाच्या निमित्ताने कोकणच्या विकासाची संधी मिळाली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी स्थलांतर थांबणे आवश्यक आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पर्यटनवाढीसाठी नवनवीन उपक्रम राबविणे आवश्यक आहे. कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणामुळे नक्कीच पर्यटक आकर्षित होणार आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे. मालवण येथे संग्रहालय निर्माण करण्याचा मानस आहे. मौर्याचा धोंडा हे देखील पर्यटनस्थळ व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.पर्यटन वाढल्यास येथील रोजगारात वाढ होणार आहे. स्वच्छतेमध्ये देशभरात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील रेल्वे स्थानक देखील स्वच्छ ठेवणे ही देखील आपली जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.

            खासदार नारायण राणे म्हणाले, परीवहन व्यवस्था प्रगतीचे परीमाण आहे म्हणून पर्यटनामध्ये रेल्वे स्थानकाचे महत्व आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांचा विकास झालेला आहे. आपल्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी नवउपक्रम राबविणार आहे. जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला असून सर्वांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

            माजी खासदार निलेश राणे म्हणाले, जिल्ह्यातील ४ रेल्वे स्थानक अगदी विमानतळावर असल्याचा भास निर्माण करतात एवढी ती स्थानके देखणी झालेली आहेत. पालकमंत्री यांनी कमी कालावधीत या स्थानकांचे सुशोभिकरण करुन जनतेला दिलेला शब्द खरा केला असल्याचेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश पवार यांनी तर आभार प्रभाकर सावंत यांनी मानले.