नांदगाव, जि. नाशिक: नांदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘शिवसृष्टी’ प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
शिवसृष्टी प्रकल्प हा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा गौरव करणारा उपक्रम आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी शिवसृष्टीचा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले. याशिवाय, नांदगाव नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला जाणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. ते राज्याची अस्मिता आणि भारताचा अभिमान आहेत. राजकोट येथे घडलेली घटना दुर्दैवी असून, राज्य शासन आणि नौदलाच्या सहकार्याने लवकरच पुन्हा भव्य पुतळा उभारण्यात येईल.”
शिवसृष्टीत मिनी थिएटर, ॲम्पी थिएटर, शिवाजी महाराजांचे प्रेरणा देणारे प्रसंग, तसेच सभोवताली आकर्षक कारंजे यांसारख्या विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसृष्टीची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
शिवसृष्टी प्रकल्पाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य नव्या पिढीसमोर प्रभावीपणे सादर होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.