पुणे, दि. ०९: सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींना तातडीने न्याय मिळावा आणि शासकीय यंत्रणेकडून तत्परतेने सोडवणूक व्हावी या उद्देशाने विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. यावेळी तीन प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली आणि संबंधित प्रकरणांमध्ये विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात झालेल्या सुनावणीदरम्यान डॉ. पुलकुंडवार यांनी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे सांगितले. सुनावणीदरम्यान पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण, नगर पालिका प्रशासन उपायुक्त पूनम मेहता आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तिन्ही प्रकरणांमध्ये तक्रारदारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली. डॉ. पुलकुंडवार यांनी तक्रारींचे तातडीने निवारण करण्याच्या सूचना दिल्या आणि जिल्हा प्रशासनाने अशा प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.