ठाणे शहरातील कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला

ठाणे, 28 ऑक्टोबर 2024: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेना पक्षाच्या वतीने महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी त्यांनी आपल्या बालेकिल्ल्यातून लढण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक आणि शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांनी शिंदे यांच्या उमेदवारीला पाठींबा दिला. शिंदे यांच्या कुटुंबीयांमध्ये वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, सून वृषाली शिंदे आणि नातू रुद्रांशही या क्षणी उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास

एकनाथ शिंदे यांचा राजकीय प्रवास हा ठाणे शहराशी घट्ट जोडलेला आहे. सुरुवातीला त्यांनी शिवसेना शाखा प्रमुख म्हणून कारकीर्द सुरू केली आणि ठाणे शहरात गृहनिर्माण तसेच विकासकामांवर भर दिला. 2004 साली पहिल्यांदा ते कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर सलग निवडणुका जिंकत त्यांनी हा मतदारसंघ आपला बालेकिल्ला बनवला आहे.

शिंदे यांनी राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी केली. 2022 मध्ये त्यांनी शिवसेनेत मोठा राजकीय उठाव करत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाच्या समर्थनाने महायुती सरकार स्थापन केले. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.

शिंदे हे त्यांच्या जमीनीवरच्या राजकारणासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ठाणे व इतर भागांत राबवलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे त्यांना लोकांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आगामी निवडणुकीतही त्यांनी विकासाचे मुद्दे प्राधान्याने मांडण्याचा निर्धार केला आहे.

शिवनेरीहुन मार्गस्थ ‘शिवस्वराज्य यात्रे’ची सांगता सभा १६ ऑक्टोबर २०२४ रोजी सांगलीच्या इस्लामपुर-वाळवा येथे संपन्न झाली, त्याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केलं.

महाराष्ट्र सांभाळण्याचा आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याची दृष्टी, शक्ती ज्यांच्यामध्ये आहे असे आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि नेते जयंतराव पाटील, ज्यांचे विचार आपण या ठिकाणी ऐकले ते संसदेतील आमचे सहकारी अमोल कोल्हे, निलेश लंके, धैर्यशील मोहिते- पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, शशिकांत शिंदे, शिवाजीराव नाईक, सुमनताई पाटील, मानसिंगराव नाईक, महेबूब शेख, सुनील गव्हाणे, प्रकाश गजभिये, नागेश फाटे, पंडित कांबळे, व्ही. बी. पाटील, नितेश कराळे, अन्य सर्व व्यासपीठावरचे सहकारी आणि उपस्थित बंधू-भगिनींनो..!

आजचा हा एका दृष्टीने ऐतिहासिक सोहळा आहे. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन राष्ट्रवादीचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे कष्ट आमच्या सहकाऱ्यांनी घेतले. ‘शिवस्वराज्य यात्रा’ सुरू केली आणि त्याची सांगता आज या ठिकाणी होत आहे. ही सांगता ऐतिहासिक आहे. मला आठवतंय की, काही वर्षांपूर्वी देशाचे प्रधानमंत्री चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत यात्रा’ सुरू होती. ती महाराष्ट्रात आल्यानंतर तिचं स्वागत राजारामबापू पाटील यांनी केलं. महाराष्ट्राची सीमा संपेपर्यंत बापू त्या यात्रेमध्ये सहभागी झाले होते. मला आठवतंय ते शेतकऱ्यांचे दुखणे मांडण्यासाठी जळगाव ते नागपूर शेतकरी दिंडी काढली होती. त्या दिंडीमध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत राजाराम बापू सहभागी झाले होते. हा इतिहास ज्यांचा आहे त्यांच्या सुपुत्राने शिवछत्रपती स्वराज्य यात्रा चालू केल्यानंतर ती यशस्वी करण्याच्या साठी प्रयत्नांची पराकष्टा केली त्याची नोंद महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोक घेतल्याशिवाय राहणार नाही.

आज एका वेगळ्या स्थितीतून महाराष्ट्र जातोय, चुकीच्या लोकांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्याची किंमत दुर्दैवाने महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रातील लोकांना द्यावी लागतेय. तुमची आणि माझी भगिनी, तुमची आणि माझी कन्या तिच्या समस्येबद्दल जयंतरावांनी अनेक गोष्टी आपल्याला सांगितल्या. अलीकडच्या काळामध्ये हे सरकार त्यांच्या हातामध्ये सत्ता खऱ्या अर्थाने होती त्यावेळेला जे करायला हवं होतं ते करण्यासाठी कधी त्यांनी भूमिका घेतली नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही लोकांनी त्यांची जागा दाखवल्यानंतर अनेक गोष्टींच्या आठवणी त्यांना व्हायला लागल्या. बहिणीची आठवण झाली. लाडकी बहीण. ठिकठिकाणी सांगितलं जातं ही योजना आम्ही काढली, तिच्या हिताची जपणूक आम्ही करू. मी काही याबाबतीत अधिक बोलणार नाही. पण एकच आहे की, या महाराष्ट्रामध्ये बहिणींसाठी, त्यांना सन्मान देण्याच्यासाठी कोणत्या कालखंडामध्ये कोणते निर्णय घेतले होते? त्याची आठवण करण्याच्या संबंधीची वेळ आहे.

मला आठवतंय स्त्रियांना आरक्षण ९ टक्क्यांवरून सुरुवात केली, आज ५० टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे. माझी भगिनी गावची सरपंच झाली, माझी भगिनी पंचायत समितीची सभापती झाली, माझी भगिनी नगरपालिकेची अध्यक्ष झाली, माझी भगिनी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या महानगरपालिकांमध्ये महापौर झाली. त्यांना सन्मान देण्यासंबंधीचं काम कोणत्या कालखंडामध्ये झालं होतं? त्याची आठवण जर केली त्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन हा काही एक दिवसाचा नव्हता. निर्णय घेतला तो निर्णय आजपर्यंत चालू राहिलेला आहे. सन्मान करायचा असेल तर तो टिकाऊ असला पाहिजे, कायमस्वरूपाचा असला पाहिजे. आज लाडकी बहीणच्या नावाने काही रक्कम तुम्ही हातामध्ये ठेवली त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण आज प्रश्न ते नाही आहेत. ज्याचा उल्लेख या ठिकाणी जयंतरावांनी केला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी रोजचे वर्तमानपत्र हे काढलं तर एक गोष्ट आपल्याला दुर्दैवाने वाचायला मिळते कुठे ना कुठे तरी स्त्रियांवर अत्याचार झाला. पुणे जिल्ह्यामध्ये सासवडच्या जवळचा एक घाट आणि त्या घाटामध्ये एका मुलीवर चार जणांनी अत्याचार केला. पुणे शहरापासून वीस किलोमीटरवर, हे पाहिजे आपल्याला? ठाणे जिल्ह्यामध्ये चार वर्षांच्या बालिकेच्या वर दोघांनी अत्याचार केले. कुठे केले? शैक्षणिक संस्थेमध्ये केले, हे महाराष्ट्रामध्ये घडतंय? कितीतरी गोष्टी आहेत. या अत्याचारासंबंधीची परिस्थिती ज्यांनी निर्माण केली त्यांच्या हातात सत्ता ठेवायची नाही हा निकाल बहिणींनी आणि त्या बहिणींच्या सगळ्या भावांनी निश्चितपणाने केला पाहिजे, आज त्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.

हे जे काही चित्र महाराष्ट्रात आहे ते चित्र बदललं पाहिजे. आम्हाला वेगळा महाराष्ट्र पाहिजे, वेगळा महाराष्ट्र याचा अर्थ काय? महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी उद्याचा महाराष्ट्र कसा होणार? आणि कसा केला जाईल? यासंबंधीची भूमिका मांडली. ती भूमिका कृतीमध्ये आणण्यासाठी अनेकांनी कष्ट केले. वसंतदादांनी कष्ट केले, राजाराम बापूंनी कष्ट केले, अनेकांची नावे सांगता येतील. या सगळ्यांची इच्छा होती की, एक शक्तिशाली प्रगत महाराष्ट्र उभा करायचा आणि हे काम या नेतृत्वाने केले. आम्हा लोकांच्या हातामध्ये सत्ता असेपर्यंत या कामावर अधिक लक्ष केंद्रित केलेलं होतं. पण हल्लीच्या काळामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या हिताची जपणूक हा विषय त्यांच्या समोर राहिलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र अनेक क्षेत्रांमध्ये कमी आहे, ज्याची आकडेवारी आपल्या भाषणामध्ये जयंतरावांनी सांगितली. एक क्षेत्र असं नाही की आज दक्षिणेच्या राज्यांशी तुलना केली, उत्तरेच्या काही राज्यांशी तुलना केली तर महाराष्ट्र त्याच्यामध्ये खालच्या पातळीवर दिसतो. एकेकाळी देशात पहिल्या क्रमांकाचे महाराष्ट्र राज्य, हा महाराष्ट्राचा लौकिक होता, तो लौकिक आज घसरलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सावरायचा, महाराष्ट्र पूर्वस्थितीवर आणायचा हे काम खऱ्या अर्थाने तुम्हाला मला सगळ्यांना करायचे आहे. त्यासाठी हा उद्यापासूनचा निवडणुकीचा कालखंड जो आहे, त्या कालखंडामध्ये एक प्रकारचे जनमत तयार करण्याची खबरदारी ती आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. मला आनंद आहे त्याची सुरुवात इथून होत आहे.

हा सगळा परिसर एक ऐतिहासिक परिसर आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक देशाच्या भागांमध्ये अनेक ठिकाणी अनेकांनी संघर्ष केला. पण जो संघर्ष, जो स्वातंत्र्याचा लढा या देशाच्या इतिहासाचा भाग झालेला आहे त्यामध्ये शिराळा आणि वाळवा याचा उल्लेख केल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होत नाही. मला आठवतंय बिळाशीचा सत्याग्रह. त्या बिळाशीच्या सत्याग्रहामध्ये अनेकांनी सामुदायिक शक्तीच्या जोरावर, ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य ढळत नाही असं म्हणणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा धडा शिकवण्याचे काम याच मातीमध्ये केलं. याच्यामध्ये अनेक कर्तुत्ववान, द्रष्टे स्वातंत्र्य सेनानी या मातीमध्ये जन्माला आले. त्याचे स्मरण ठेवणे ही तुमची – माझी जबाबदारी आहे. क्रांतिसिंह नाना पाटील असतील, डीडी बापू असतील, नागनाथ नाईकवाडे असतील, आनंदराव नाईक असतील, फत्तेसिंह आप्पा नाईक असतील, एस डी पाटील असतील, वसंतदादा असतील, यशवंतराव चव्हाण असतील, राजारामबापू पाटील असतील या सगळ्यांनी या देशाला मुक्त करण्यासाठी आणि योग्य रस्त्यावर नेण्यासाठी आयुष्याचा अतिशय महत्त्वाचा कालखंड हा आपल्या सगळ्यांच्या समोर दिलेला आहे. त्यामुळे एवढे मोठे योगदान आपल्या वरिष्ठांनी आपल्याला दिलं. आज त्या योगदानाची नोंद करून नुसतं बसून चालणार नाही. त्या योगदानाची आठवण करणे आणि ज्या प्रकारचा महाराष्ट्र हा घडवायचा स्वप्न ह्या स्वातंत्र्य सेनानींच्या अंत:करणात होता, विचारात होता तो महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, उभा करायचा आहे. ते उभं करण्याच्या संबंधीचं सूत्र नजरेसमोर ठेवा आणि त्या पद्धतीने कामाला लागा.

मला एका गोष्टीचे आनंद आहे ते सगळे काम करण्यासाठी आज जयंतराव ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडतायत, काम करतायेत, कष्ट करतायेत, लोकांना विश्वास देतायत, दिलासा देत आहेत त्यांच्या या प्रयत्नांच्या पाठीशी महाराष्ट्राची तरुण पिढी सामुदायिक पणाने एका विचाराने निश्चित उभी राहील आणि जे स्वप्न आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात महाराष्ट्राबद्दलचे आहे त्याची पूर्तता या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. हे काम एक ऐतिहासिक काम आहे आणि ज्या भागातील नेतृत्वाने स्वातंत्र्याच्या साठी एक इतिहास निर्माण केला मला आनंद आहे की आजच्या पिढीच्या जयंतरावसारख्या नेतृत्वाला उद्याचा महाराष्ट्र घडवण्याच्यासाठी, सावरण्यासाठी भूमिका आपल्या खांद्यावर घ्यावी ही तुमची, माझी आणि संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. त्या अपेक्षेच्या पूर्ततेला तुम्हा सगळ्यांची शक्ती असली पाहिजे. त्यांनी आत्ता सांगितलं त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं आहे, विचार सांगायचे आहेत, दृष्टिकोन सांगायचा आहे, कसा महाराष्ट्र उभा करायचा? हे सांगायचं आहे आणि एक प्रत्यक्ष घडवायचे आणि हे करण्यासाठी त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना आपले घर, आपला मतदारसंघ हे सांभाळण्याचे काम तुम्हा सर्वांना करावे लागेल. हे काम तुम्ही कराल याचा मला शंभर टक्के विश्वास आहे. या सगळ्या कामाला आम्हा सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. मी एवढच सांगतो पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो, देशाच्या पक्षाचा प्रमुख म्हणून सांगतो की उद्याचा महाराष्ट्र सावरण्याच्यासाठी आणि उद्याचा प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी मोलाची कामगिरी याच परिसरातून होणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण हे गाव मोठे ऐतिहासिक गाव आहे. या साखराळे गावामध्ये साखर कारखाना उभे करण्याचे काम राजाराम बापूंनी केलं होतं. याच गावामध्ये आज आपण जमतोय आणि याच भागातल्या सुपुत्राच्या हातामध्ये महाराष्ट्र उभारण्याची, महाराष्ट्र सावरण्याची आणि महाराष्ट्र पुढे नेण्याची ही जबाबदारी आपण त्यांच्यावर टाकतोय. मी आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे आमचे सगळे सहकारी आणि महाराष्ट्राची तरुण पिढी शक्तीने त्यांच्या पाठीशी उभी राहील, हा दिलासा आणि हा विश्वास या ठिकाणी देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो.

जय हिंद, जय महाराष्ट्र!

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान तर
२३ नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी जिल्ह्यात ०६ लाख ७२ हजार ०५३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

-जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्ग दि १६ (जिमाका वृत्त) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या ३ विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान तर शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुका शांततेत पार पाडाव्यात या दृष्टीने सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी श्री. पाटील म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसूचना मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०२४ रोजी प्रसिद्ध होईल. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक मंगळवार,२९ ऑक्टोबर, २०२४ असा आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी बुधवार, दिनांक ३० ऑक्टोबर, २०२४ रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस सोमवार, दिनांक ४ नोव्हेंबर, २०२४ आहे. या निवडणूकीसाठी बुधवार, २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होईल तर शनिवार, २३ नोव्हेंबर, २०२४ मतमोजणी होईल. तर सोमवार, २५ नोव्हेंबर, २०२४ रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या ३ विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ ऑक्टोबर, २०२४ पर्यंत कणकवली विधानसभा मतदारसंघात १ लाख १३ हजार ४८२ पुरुष, १ लाख १६ हजार ०६१ महिला, १ तृतीयपंथी असे २ लाख २९ हजार ५४४ मतदारांची संख्या आहे. कुडाळ विधासभा मतदारसंघात १ लाख ७ हजार २०१ पुरुष, १ लाख ८ हजार २८२ महिला, असे २ लाख १५ हजार ४८३ मतदारांची संख्या आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात १ लाख १३ हजार ५६० पुरुष, १ लाख १३ हजार ४६६ महिला, असे २ लाख २७ हजार ०२६ मतदार असे एकूण ६ लाख ७२ हजार ०५३ मतदार आहेत.
८५ वर्षावरील वयोगटातील मतदारांची संख्या ११ हजार ३६४ इतकी असून जिल्ह्यात ०७ हजार ९०० इतके मतदार हे दिव्यांग आहेत. मतदान केंद्रावर त्यांच्या सोईसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात ९२१ मतदान केंद्र (कणकवली ३३२, कुडाळ २७९ व सावंतवाडी ३१०) असून आयोगाच्या सूचनानुसार ५० टक्के मतदान केंद्रावर वेबकॉस्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सेक्टर अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितचे अनुषंगाने शासकीय जागेवरील बॅनर, पोस्टर काढण्यात येवून अंमलबजावणी करण्यात येत आहे. यावर्षी मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे मोठया प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध आहे. व्होटर हेल्प लाईनद्वारे मतदारांना मतदानाचे दिवशी ऑनलाईन पध्दतीने आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे त्याबाबत माहिती मिळविण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करावा. सी -व्हिजल ॲपद्वारे नागरीक आचारसंहिता भंगाची तक्रार करु शकतात. तर केवायसी ॲपद्वारे नागरिकांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची सर्व माहिती जाणून घेता येणार आहे. तर राजकीय पक्ष व उमेदवारांना विविध परवानगीसाठी सुविधा अॅप द्वारे उमेदवार विविध परवानगी मागू शकतात. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने नुकतीच १०० विभाग प्रमुखांची बैठक घेऊन आचार संहितेबाबत करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने निर्देश दिले, निवडणुकीसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून तसे आदेश पारित केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गोमातांचे पूजन: देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून मान्यता

नांदेड, 13 ऑक्टोबर 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नांदेड येथे आयोजित महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या प्रारंभी देशी गोमातांचे विधिवत पूजन करून शुभारंभ केला. कार्यक्रमापूर्वी त्यांनी लाल कंधारी, मथुरा लभाण आणि देवणी या देशी गायींना पुष्पहार अर्पण करून श्रद्धापूर्वक वंदना केली.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र शासनाने देशी गायींना ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. या उपक्रमाचा उद्देश स्थानिक गोवंश संवर्धनाला चालना देणे आणि पर्यावरणपूरक तसेच पारंपरिक पद्धतींच्या शेतीचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे. देशी गायींच्या दुग्धजन्य उत्पादनांमुळे पोषणवर्धक मूल्यांसोबतच शेतकऱ्यांच्या अर्थकारणातही सुधारणा घडवता येईल, असा शासनाचा विश्वास आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी या पूजनाच्या माध्यमातून गोसेवा आणि महिलांच्या सशक्तीकरणाला जोडण्याचा संदेश दिला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गायींशी आपले नाते फक्त धार्मिकच नाही तर आर्थिक आणि पर्यावरणीयदृष्ट्याही महत्त्वाचे आहे. देशी गायींचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे.”

कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी महिला सशक्तीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध सरकारी योजना आणि उपक्रमांची माहिती दिली. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी गायपालन, दुग्ध व्यवसाय आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी जाहीर केले.

शासनाने दिलेल्या ‘राज्यमाता-गोमाता’ दर्जामुळे देशभरात गोसेवा आणि गोसंवर्धनाची चळवळ अधिक गतीने पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील पारंपरिक देशी गोवंशांचे पुनरुज्जीवन होण्यासह ग्रामीण अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा आहे.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी महिलांवरील अत्याचाराचा निषेध केला, गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातील संबंध असल्याचे सांगितले

नागपूर, 12 ऑक्टोबर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख डॉ. मोहन भागवत यांनी भारतातील महिलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि अशा गुन्ह्यांमुळे गुन्हेगारी आणि राजकारण यांच्यातील अस्वस्थ संबंध दिसून येतात. आरएसएसच्या ९९व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील विजयादशमी कार्यक्रमात बोलताना भागवत यांनी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील अलीकडील लज्जास्पद घटनेचा विशेष उल्लेख केला.

“आरजी कार हॉस्पिटलमधील घटना ही आपल्या समाजासाठी लांच्छनास्पद आहे,” असे भागवत यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांनी भर दिला की अशी कृत्ये अलिप्त नसून गुन्हेगारी आणि राजकीय हितसंबंधांच्या वाढत्या गुंफणामुळे होतात, ज्यामुळे न्याय सुनिश्चित करणे कठीण होते. “या हानिकारक आघाड्या मोडून काढण्यासाठी समाजाने एकत्र येण्याची वेळ आली आहे,” ते पुढे म्हणाले.

भागवत यांनी विजयादशमी व्यासपीठाचा वापर केला – आरएसएससाठी महत्त्वपूर्ण सांस्कृतिक आणि प्रतीकात्मक महत्त्वाचा प्रसंग – महिलांची सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी सरकार आणि नागरिकांना एकत्र काम करण्याचे आवाहन करण्यासाठी. “जो समाज आपल्या महिलांचे संरक्षण करण्यात अयशस्वी ठरतो तो त्याचे नैतिक स्थान गमावून बसतो,” त्यांनी जोर दिला.

समाजाच्या प्रत्येक स्तरावर आदर, जबाबदारी आणि उत्तरदायित्व यांसारख्या मूल्यांना चालना देण्याच्या महत्त्वाचा पुनरुच्चार करून, अशा हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या मूळ मुद्द्यांचा सामना करण्यासाठी आत्मनिरीक्षण आणि सामूहिक प्रयत्नांचे आवाहन आरएसएस प्रमुखांनी केले.

नागपुरातील RSS मुख्यालयात आयोजित वार्षिक विजयादशमी उत्सवात हजारो स्वयंसेवक आणि मान्यवर येतात. या वर्षीच्या कार्यक्रमाला अतिरिक्त महत्त्व प्राप्त झाले कारण संस्थेची शताब्दी जवळ येत आहे, भागवतांच्या भाषणाने RSS च्या प्राधान्यक्रम आणि चिंता पुढे जाण्यासाठी टोन सेट केला.

भागवत यांनी आपल्या भाषणाचा समारोप ऐक्याचा संदेश देऊन केला, “विजयादशमी हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. नागरिक या नात्याने, कोणत्याही स्वरूपातील वाईट- मग तो गुन्हा, भ्रष्टाचार किंवा अन्याय असो- आपल्या समाजातून उखडून टाकणे हे आपले कर्तव्य आहे.”

आरजी कार हॉस्पिटलमधील घटना आणि भागवत यांच्या तीक्ष्ण टिप्पणीमुळे राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटल्या आहेत, आता अनेक नेत्यांना महिलांच्या सुरक्षेसाठी निर्णायक पावले उचलण्याचे आवाहन केले जात आहे.

पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. ९: पिंपरी चिंचवड शहर राज्याचे ग्रोथ इंजिन असून येथील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी सर्व ते प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिका अंतर्गत विविध विकास कामांचे ई- लोकार्पण, ई- भूमीपूजन निमित्त नटसम्राट निळू फुले रंगमंदिर पिंपळे गुरव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार अण्णा बनसोडे, महेश लांडगे, श्रीमती अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय चौबे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत जवळपास १ हजार ७०० कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण, भूमीपूजन घेण्यात आली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, ही औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची, कामगारांची नगरी असून हे शहर चहुबाजूंनी वाढले आहे. पिंपरी चिंचवडकडे राज्याचे ग्रोथ इंजिन म्हणून पाहिले जाते. मुंबईप्रमाणेच हे शहर कोणाला उपाशी ठेवत नाही, निराश करत नाही. त्यामुळे मुंबई प्रमाणेच हे शहर म्हणजे ‘सिटी ऑफ होप’ आहे.

या शहरात सांस्कृतिकदृष्ट्याही विकास करण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे येथे आयोजन करण्यात आले. आपली मातृभाषा मराठीचा अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर अखेर प्रधानमंत्री यांनी अभिजात भाषेत समावेश केल्याबद्दल प्रधानमंत्री यांचे आभार मानत असल्याचेही श्री. पवार यावेळी म्हणाले.

लोकसंख्या जास्त असल्याने या शहरात पायाभूत सुविधा देण्यासह शहर नियोजनबद्ध वाढले पाहिजे या दृष्टीकोनातून रस्ते, भुयारी मार्ग, उड्डाणपूल आदी अनेक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. शहराला योग्य दाबाने पुरेसे पाणी देण्यासाठी अनेक ठिकाणी पाण्याच्या मोठ्या टाक्या बांधण्यात येत आहेत. वाहतूक कोंडी सोडविण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांनीही वाहतूक शिस्त राखून सहकार्य करावे. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलीस विभागाला मोठ्या प्रमाणात वाहने तसेच अन्य आवश्यक बाबी देण्यात येत आहेत, असेही ते म्हणाले.

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना सर्व समाजघटकांना लाभ देण्याच्या दृष्टीने लाडकी बहिण योजना, मोफत ३ गॅस सिलेंडर, गरीब मुलींना महाविद्यालयीन शिक्षण मोफत देण्याची योजना आणली. तसेच शेतकऱ्यांसाठी वीजमाफीची योजना, दुधाला अनुदान देण्याची योजना, जन्माला आलेल्या मुलीला १ लाख १ हजार रुपये टप्प्या टप्प्याने देण्याची योजना, केंद्र शासनाच्या लखपती दीदी योजनेंतर्गत देशात करावयाच्या ३ कोटी पैकी महाराष्ट्रातील ५० लाख महिलांना लखपती दीदी करण्यात येणार आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे देण्याची योजना राबविण्यात येत आहे.

लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या सर्व योजना सुरूच राहतील
महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे, असे सांगून श्री. पवार पुढे म्हणाले, देशात सर्वाधिक वस्तू व सेवा कर (जीएसटी) जमा होत असल्याने राज्याचा सर्वाधिक हिस्सा महाराष्ट्राला मिळतो. राज्याला आर्थिक शिस्त कशी लागली पाहिजे, अनावश्यक खर्च थांबविणे, उत्पन्नाचे स्रोत वाढविणे, वस्तू व सेवा कर (जीएसटी), उत्पादन शुल्क आदी कराची रक्कम शासनाच्याच तिजोरीत यावी, नोंदणी शुल्काचे उत्पन्न मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना लाभ देणाऱ्या कोणत्याही योजना थांबणार नाहीत, सर्व योजना चालूच राहतील.

चुकीचे प्रकार, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागाला सूचना दिल्या आहेत. या शहरात माय माता, मुली, बहिनी सुरक्षित रहाव्यात, चोऱ्या माऱ्या होऊ नयेत यासाठी शहरात सीसीटिव्हीची नजर आहे. कोणतेही चुकीचे प्रकार, दहशत, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. मुली, स्त्रियांनी देखील काळजी घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांनी माता भगिनींची सन्मान करण्याची शिकवण दिली आहे. त्यानुसार काम व्हावे, असेही ते म्हणाले.

माता रमाईंचा पुतळा उभारण्याच्या दृष्टीने कार्यवाही
पिंपरी चिंचवड येथे असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे असलेल्या पीएमपीएमएलच्या जागेत माता रमाईंचा पुतळा उभा करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

विविध समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर आदीवासी समाजाकरिता टार्टी संस्था, मातंग समाजाकरिता आर्टी, मराठा समाजाकरिता सारथी, इतर मागासवर्गीय समाजाकरिता महाज्योती, आर्थिक मागास समाजाकरिता अमृत संस्था, बंजारा समाजाकरिता वनार्टी, अल्पसंख्य समाजाकरिता मार्टी या संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्या माध्यमातून या समाजातील मुला-मुलींना शिक्षण, प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

याशिवाय अनेक समाजांकरिता वेगवेगळी महामंडळे काढलेली आहेत. अजून काही घटक समज राहिलेले असतील त्यांचाही यासाठी विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

मुळा नदीकाठ सुधार प्रकल्पाचा टप्पा 1 चा शुभारंभ होत असताना नदीच्या एका बाजूला पिंपरी चिंचवड आणि दुसऱ्या बाजूला पुणे महानगरपालिका असल्याने पुणे महानगरपालिकेलाही त्याचवेळी निविदा करण्यास सांगितले असल्याने दोन्ही कामे एकाच वेळी होऊन चांगले काम होईल, असेही ते म्हणाले.

यावेळी प्रास्ताविकात आयुक्त श्री. सिंह यांनी पालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजना, पायाभूत सुविधा प्रकल्पांची माहिती दिली. पूल, रस्ते, भुयारी मार्ग, इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर (आयसीसीसी), प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे आदींबाबत माहिती दिली.

त्यापूर्वी श्री. पवार यांच्याहस्ते कळ दाबून विविध विकास कामांचे ई- लोकार्पण, ई- भूमीपूजन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रकल्पांची माहिती असलेली आणि आयसीसीसी प्रकल्पाच्या माहितींच्या चित्रफीती दाखविण्यात आल्या.

झोपडपट्टीधारकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या निवासी सदनिकांची चावी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आली. महानगरपालिका आणि सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी व १२ वीच्या मुलींसाठी सुरू केलेल्या कौशल्य विकासाच्या विविध अभ्यासक्रमांतर्गत मुलींना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्र देण्यात आले.

निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची-जिल्हाधिकारी अनिल पाटील

स्वच्छ भारत दिवस साजरा

  • स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद
  • कसाल गावात ‘स्वच्छता रॅली’चे आयोजन
  • विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव

सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेच्या बाबतीत अग्रेसर जिल्हा म्हणून सर्वपरिचित आहे. जिल्ह्यातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटलेले असल्याने जिल्ह्यात सगळीकडे स्वच्छता पाहायला मिळते. ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ ही यावर्षीची थीम आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये स्वच्छतेचा संस्कार रुजवणे आवश्यक असून निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता महत्वाची असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून’ स्वच्छ भारत दिवस साजरा’ करावयाचा आहे. त्या अनुषंगाने आज कसाल हायस्कुल येथे स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार गणेश जेठे, लवु महाडेश्वर, कसाल ग्रामपंचायतीचे सरपंच श्री परब , कसाल हायस्कुलचे पदाधिकारी, गांवकरी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, विद्यार्थी दशेतच मनावर संस्कार रुजत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण करावी जेणेकरुन विद्यार्थी घरी जाऊन पालकांना स्वच्छतेचे महत्व सांगतील. सर्वांनी स्वत: कचरा करणार नाही ही शपथ घ्यावी. शिवाय सर्वांनी स्वच्छतेच्या बाबतीत RRR म्हणजेच Reduce, Reuse आणि Recycle हा नियम पाळावा म्हणजे आपल्या परिसरात कचरा कमीत कमी होईल. घरात, परिसरात, गल्लीत तसेच आपल्या गावात होणाऱ्या कचऱ्याची सर्वांनी योग्य विल्हेवाट लावावी. स्वच्छतेशिवाय आपले आरोग्य चांगले राहणार नाही असेही ते म्हणाले.
श्री देशमुख म्हणाले स्वच्छता हा संस्कार असल्याने तो आपल्या अंगी असणे आवश्यक आहे. स्वच्छतेची सुरूवात स्वत:पासून करावी. जेवढी भौतिक स्वच्छता महत्वाची आहे तेवढीच मानसिक स्वच्छता देखील महत्वाची आहे. आजच्या सोशल मिडियाच्या विश्वात अनेकांची मने अस्वच्छ झाली असल्याने सर्वांनी मानसिक अस्वच्छता दूर करणे देखील तेवढेच आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
श्री जेठे यांनी स्वच्छतेविषयी आपले अनुभव कथन केले. ते म्हणाले मी रोज सकाळी पायी फिरताना एक पिशवी घेऊन फिरत असे आणि रस्त्यात दिसणारा कचरा त्या पिशवीत वेचत असे. सुरूवातीला लोकांनी माझ्या कृती कडे दुर्लक्ष केले परंतु काही दिवसांनी माझ्या स्वच्छता मोहिमेत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि आम्ही स्वच्छता चळवळ उभी करु शकलो. त्यामुळे प्रत्येक चळवळ यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग तितकाच महत्वाचा असल्याचेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला श्री ठाकुर यांनी प्रास्ताविक केले. स्वच्छता पंधरवड्यात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. स्वच्छतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. ही मोहिम फक्त पंधरवड्यापुरती मर्यादित न राहता रोजच साजरी होणे आवश्यक आहे. यासाठी आपण स्वच्छता अंगिकारणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. कसाल इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व नृत्यातून सादर केले. यावेळी ‘स्वच्छ माझे आंगण’ या स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक शुभांगी परब, व्दितीय तन्वी परब तर तृतीय पारितोषिक रुपेश नादीवडेकर यांना मिळाले. तसेच भाषणाव्दारे स्वच्छतेचे महत्व सांगणाऱ्या ध्रुव मालवणकर, पृथा पेडणेकर, सोनम प्रजापती आणि भार्गवी सुपल यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमानंतर कसाल येथील युनियन बँक ते बस स्थानक अशी रॅली काढून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीने दिलेल्या डस्ट बीनचे लोकार्पण देखील करण्यात आले.

महाराष्ट्रात ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता, सरकारच्या पाठपुराव्यामुळे यश

राज्य सरकारच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातील ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना अखेर मान्यता मिळाली आहे. या महाविद्यालयांच्या स्थापनेसाठी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रिफ यांच्या कार्यकाळात मोठा पुढाकार घेण्यात आला. या नवीन महाविद्यालयांमुळे ८०० विद्यार्थ्यांना MBBS अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची संधी मिळणार आहे.

या महाविद्यालयांची स्थापना मुंबई, नाशिक, गडचिरोली, अमरावती, वाशीम, जालना, बुलढाणा, अंबरनाथ, भंडारा आणि हिंगोली या ठिकाणी करण्यात येणार आहे. हसन मुश्रिफ यांच्या मंत्रीपदाच्या काळात या १० सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी मिळाल्यामुळे राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारची धोरणं प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची आहे, ज्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध होईल. सध्या राज्यात एकूण ३५ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं असून, दरवर्षी ४८५० विद्यार्थ्यांना सरकारी महाविद्यालयांतून प्रवेश मिळणार आहे.

ही महत्त्वपूर्ण पाऊल राज्यातील आरोग्य सेवांमध्ये मोठे बदल घडवणार आहे आणि ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मदत होणार आहे.

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मुंबई, 2 ऑक्टोबर, 2024: उपेक्षित समुदायांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सार्वजनिक सेवेतील प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित कारकीर्द असलेले श्री. अडसूळ यांनी त्यांच्या नवीन भूमिकेचा कार्यभार स्वीकारला आणि राज्यातील अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) समुदायांच्या उन्नतीसाठी परिश्रमपूर्वक काम करण्याचे वचन दिले.

श्री. अडसूळ यांच्या नियुक्तीचे समाजातील विविध घटकांनी स्वागत केले आहे, विशेषत: वंचित समुदायांच्या हक्कांसाठी सामाजिक न्याय आणि वकिलीसाठी त्यांचे पूर्वीचे योगदान लक्षात घेऊन. त्यांच्या राजकारणातील आणि प्रशासनातील अनुभवामुळे SC आणि ST समुदायांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्याची आयोगाची क्षमता वाढेल अशी अपेक्षा आहे.

अडसूळ यांच्यासोबतच धर्मपाल मेश्राम यांची आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सामाजिक न्यायाचे सुप्रसिद्ध वकील श्री. मेश्राम यांनीही त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. याशिवाय, गोरक्ष लोखंडे आणि वैदेही वधान या दोन प्रमुख व्यक्तींची आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्याही स्वीकारल्या आहेत, आयोगाच्या नेतृत्व संघाला अधिक बळकट केले आहे.

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग SC आणि ST समुदायांचे कल्याण, हक्क आणि तक्रारींचे परीक्षण आणि निराकरण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. या नवीन नियुक्त्यांसह, आयोगाने आपल्या आदेशाचा पाठपुरावा नव्या जोमाने करणे, राज्यात अधिक सामाजिक समानता आणि न्याय सुनिश्चित करणे अपेक्षित आहे.

श्री अडसूळ यांच्या नेतृत्वाखालील नवीन नेतृत्वाने भेदभाव, शिक्षणात प्रवेश, आरोग्यसेवा आणि SC आणि ST लोकसंख्येसाठी आर्थिक संधी यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकारी संस्था आणि नागरी संस्थांसोबत काम करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.

ही नियुक्ती महाराष्ट्रातील उपेक्षित समुदायांना सशक्त करण्यासाठी आणि सत्तेच्या कॉरिडॉरमध्ये त्यांच्या चिंतांना मजबूत आवाज देण्यासाठी एक पाऊल म्हणून पाहिले जाते.

१६ हजार पेक्षा जास्त मते मिळवून देणार असल्याची ग्वाही वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी दिली.

वास्को(प्रतिनिधी) दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडूण येणार आहे.मुरगाव तालुक्यातील वास्को मतदार संघातून भाजप उमेदवाराला १६ हजार पेक्षा जास्त मते मिळवून देणार असल्याची ग्वाही वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी दिली.
भारतीय जनता युवा मोर्चा , नमो युवा चौपाल ( चाय पे चर्चा) कार्यक्रम वास्को बसस्थानकावर पार पडला. यावेळी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांच्या समवेत गोवा भाजप युवा मोर्चा अध्यक्ष समिर मांद्रेकर, राज्य मानव संसाधन विकास मंडळाचे उपाध्यक्ष तथा वास्को भाजप गटाध्यक्ष दिपक नाईक, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेविका शमी साळकर, दक्षिण गोवा भाजप युवा मोर्चा सचिव किरण नाईक, वास्को भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमय चोपडेकर, प्रशांत नार्वेकर, संदीप नार्वेकर, दिलीप काजळे, माजी नगरसेवक अनिल चोपडेकर, माजी नगरसेविका रोचना बोरकर व इतर पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिकल ३७० हटवून जम्मू काश्मीरला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या मागदर्शनाखाली गोव्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागत आहे. दक्षिणेत भाजप उमेदवार लोकसभा निवडणुकीत यश संपादन करून ४०० पार मध्ये महत्वाची भूमिका बजावणार असल्याचे आमदार कृष्णा साळकर यांनी सांगितले.वास्को भाजप गटाध्यक्ष दिपक नाईक यांनी केंद्र सरकारच्या योजना विषयी माहिती देताना सांगितले की, प्रत्येकांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजनाचा लाभ घेणे आवश्यक आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात गरीब, मध्यम वर्गीयांना सर्व सवलती प्राप्त झाल्या असून यात आणखीन भर घालण्यासाठी भाजपला येत्या लोकसभा निवडणुकीत ४०० पार करण्याचे आवाहन केले. दक्षिण गोव्याचे काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी निवडून येऊन कधीच वास्कोचा विचार केला नाही. खासदार म्हणून सार्दिन सपशेल अपयशी ठरले असल्याची माहिती दिपक नाईक यांनी दिली. याप्रसंगी नगराध्यक्ष गिरीश बोरकर, किरण नाईक व इतरांची मार्गदर्शन पर भाषणे झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ कासकर तर आभार प्रदर्शन दामोदर लोटलीकर यांनी केले.
फोटो: वास्को बस स्थानकांवर भारतीय जनता युवा मोर्चा, नमो युवा चौपाल कार्यक्रमात जनतेला मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा साळकर, बाजूस वास्को भाजप गटाध्यक्ष दिपक नाईक , नगराध्यक्ष गिरीश बोरकर, अमय चोपडेकर व इतर.